नाशिक : नांदुरी गडाच्या पायथ्याशी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना भरधाव कारने धडक दिल्याची भीषण घटना मध्यरात्रीच्या दीडच्या सुमारास नांदुरी-अभोणा टी-पॉइंट परिसरात घडली. या अपघातात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह एकूण 11 भाविक गंभीर जखमी आहे.या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
नेमकं काय घडलं?
शारदीय नवरात्रौत्सव सुरु असल्याने नांदुरी गडाच्या पायथ्याशी अभोणा टी पॉईंटवर बंदोबस्तासाठी रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्यावर तैनात होते. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड, दिनकर मुंडे आणि हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांचा समावेश होता. दरम्यान, नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मारुती सियाज कारने स्पीड ब्रेकरजवळ एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर ही कार चुकीच्या बाजूने येऊन समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारला चालकाच्या बाजूने धडकली. पुढे रस्त्याच्या मध्यभागी लावलेल्या पोलीस बॅरिकेड्सला धडक देत या कारने बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही जोरदार धडक दिली.
या अपघातात पोलीस उपनिरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांच्या डाव्या पायाच्या पंजाला फ्रॅक्चर झाले. याशिवाय मुंबई येथील मोरेश्वर बाळू पाटील (वय५२) यांचाही डावा पाय फ्रॅक्चर झाला. अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहेर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने वणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.तर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह 11 भाविक जखमी झाले आहेत.
जखमीची नावे समोर
दिनकर मुंडे, सहाय्यक पोलीस निरीकक्ष, सचिन राऊत, वाहतुक पोलिस, कपिल साळी, मोरेश्वर पाटिल, गोपाळ सोनवणे, दुर्गेश चौधरी, सोहम पवार, राजाराम जाधव, राधाबाई गावित जखमी झाले असुन जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.